
लातूर, 01 जून (हिं.स.)।
जलसमृद्ध औसा अभियान व एकात्मिक विकास कार्यक्रमांतर्गत हिप्परगा व कवळी परिसरात सुरू असलेल्या नाला खोलीकरण, सरळीकरण व जलसंधारण कामांची आज आमदार पवारांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
जलसमृद्ध औसा अभियानाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी राहत आहे. हिप्परगा व कवळी येथे सुरू असलेल्या कामांमुळे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात अडविणे व जमिनीत मुरविणे शक्य होणार असून भूजल पातळीत वाढ होण्यास मोठी मदत मिळणार आहे. याचा थेट फायदा विहिरी, बोअरवेल आणि शेतीसाठी होणार आहे. असे प्रतिपादन आमदार पवारांनी या प्रसंगी केले
जलसमृद्ध औसा या उपक्रमांतील कामे ही क्रिएटिव्ह फाउंडेशन, टाटा मोटर्स फाउंडेश व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे जलसंधारण क्षेत्रात सकारात्मक बदल घडत आहे.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.परीक्षित पवार, हिप्परगा येथील सरपंच संतोष गोरे, माळकोडजीचे सरपंच जयशंकर विभुते, टाका येथील उपसरपंच अतुल शिंदे, सदाशिव जोगदंड, गणेश माळी यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis