
* पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांना मिळणार आधुनिक पोषणशास्त्राची जोड
मुंबई, 01 जून (हिं.स.) : मुंबई आणि ठाणे परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आरोग्याविषयी मोठी जनजागृती पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, आयुर्वेद-आधारित लाइफस्टाइल हेल्थकेअर क्षेत्रातील अग्रगण्य संस्था माधवबागने 'फूडआरएक्स' ही नाविन्यपूर्ण संकल्पना आरोग्य क्षेत्रात सादर केली आहे. ही संकल्पना प्रामुख्याने मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणा यांसारख्या गंभीर जीवनशैलीजन्य आजारांवर यशस्वी उपचार घेतलेल्या तब्बल १० लाखांहून अधिक रुग्णांच्या अनुभवावर आणि वैद्यकीय डेटावर आधारित आहे.
माधवबागचे प्रमुख डॉ. रोहित माधव साने यांच्या मार्गदर्शनाखाली 'फूडआरएक्स' ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. या नव्या आहारपद्धतीमध्ये प्रोटीन आणि फायबरयुक्त अस्सल भारतीय खाद्यपदार्थांना विशेष आणि मानाचे स्थान देण्यात आले आहे.
आपल्या रोजच्या खाण्यातील उपमा, ढोकळा, चीला आणि डोसा यांसारखे पारंपरिक चविष्ट पदार्थ आता केवळ भूक शमवण्यासाठी मर्यादित न राहता, थेट दैनंदिन आरोग्य व्यवस्थापनाचा एक मुख्य भाग बनवले जात आहेत. यामुळे रुग्णांना घरगुती जेवणातूनच आरोग्याचा मार्ग सापडणार आहे. माधवबागच्या तज्ज्ञांच्या मते, योग्य आणि संतुलित आहार हीच भविष्यातील सर्वात मोठी प्रतिबंधात्मक चिकित्सा ठरू शकते. लोकांना वेगवेगळ्या रासायनिक औषधांवर प्रमाणाबाहेर अवलंबून राहण्यापूर्वीच, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये योग्य ते बदल करून त्यांना निरोगी बनवणे हेच 'फूडआरएक्स' चे मुख्य उद्दिष्ट आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी