
अमरावती, 01 जून (हिं.स.)।
विधानपरिषद निवडणुकीत १७ पैकी १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार असून महायुतीला केवळ विजयच नव्हे तर मोठा विजय मिळेल,असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील जागावाटपाचा निर्णय महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकमताने घेतला असून भारतीय जनता पक्ष ११, शिवसेना (शिंदे गट) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट) २ जागांवर निवडणूक लढवणार असून महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमरावतीच्या संदर्भात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी दोघेही प्रगल्भ नेते असून काही स्थानिक मतभेद असले तरी ते महायुतीसोबतच राहतील, असे स्पष्ट केले. मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे सांगताना बावनकुळे यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला स्थानिक राजकीय परिस्थिती आणि मतदार संघातील ताकद लक्षात घेऊन ठरविण्यात आल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसने स्वतःच्या नगरसेवकांमध्ये नाराजी का निर्माण झाली याचा आत्मपरीक्षण करावे. महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी काँग्रेसवर टीका करत महिला आरक्षण विधेयकाला पूर्ण पाठिंबा न दिल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्याची संधी गमवावी लागल्याचा आरोप केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी