
लातूर, 01 जून (हिं.स.)।
: आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांनी आज उत्साही वातावरणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध पक्षांच्या नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राज्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी बसवराज पाटील यांना विधान परिषदेत पाठविण्याचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अभ्यासू, लोकसंवादी आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय नेतृत्व म्हणून बसवराज पाटील यांच्याकडे पाहिले जात असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार रमेशप्पा कराड, आमदार अभिमन्यू पवार, आमदार विक्रम काळे, आमदार सुरेश धस, अर्चना पाटील चाकूरकर, महाराष्ट्र प्रदेश भाजप उपाध्यक्ष अफसर शेख, माजी खासदार सुनील गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. विधान परिषद निवडणुकीत बसवराज पाटील यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने कामाला लागल्याचे यावेळी सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis