
पुणे, 01 जून (हिं.स.)। पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील उमेदवारीचा तिढा अद्याप कायम आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी भाजपचे माजी खासदार जय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. मात्र, माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनिल टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनाही पक्षाकडून ‘एबी फॉर्म’ देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण असणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून त्यानंतरच पक्षाचा अंतिम उमेदवार निश्चित होणार आहे.या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सुरुवातीला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मतभेद दिसून आले होते. ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याची असली तरी भाजपनेही त्यावर दावा केला होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली.सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत माजी खासदार संजय काकडे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर विक्रम काकडे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.मात्र, या निर्णयानंतर पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. सुनील टिंगरे यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरत अर्ज दाखल केला. त्यामुळे दोन्ही इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आल्याचे समोर आले आहे.आता ४ जून रोजी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत पक्ष नेतृत्व कोणाला माघार घेण्याचे निर्देश देते आणि राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण ठरतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु