
बीड, 01 जून (हिं.स.) : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याच्या बीडमधील शाहू नगर परिसरातील चार मजली अनधिकृत इमारतीवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. बीड नगरपालिकेने दिलेली नोटीस आणि अल्टिमेटम संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराने स्वतःहून हे अवैध बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.
सीबीआयकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर आणि बीड येथून अनेकांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर काही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून लातूरमधील RCC क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांचे संगनमत उघड झाले आहे. लातूरमधील एका बालरोगतज्ज्ञांच्या फ्लॅटमध्ये कुलकर्णी क्लासेस चालवत असल्याचेही समोर आले आहे.
याशिवाय, मोटेगावकर क्लासेसमध्ये ‘प्लॅटिनम गोल्ड बॅच’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, कुलकर्णीचे पुण्यातील एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेशीही संपर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीबीआय सध्या कुलकर्णी, मोटेगावकर आणि संबंधित व्यक्तींमधील कथित नेटवर्कचा सखोल तपास करत असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis