जनरल डब्यांची गर्दी वाढली; लातूरकरांचा संताप
रेल्वे प्रवास बनला त्रासदायक; अतिरिक्त जनरल डब्यांची मागणी लातूर-मुंबई रेल्वेत जनरल डबे अपुरे; प्रवासी हैराण उभ्याने प्रवासाची वेळ; जनरल डब्यांसाठी प्रवाशांचा आक्रोश लातूर, 01 जून (हिं.स.) - लातूर, बीड, धाराशिव आणि परिसरातील हजारो प्रवाशांसाठी म
रेल्वेत गर्दी


रेल्वे प्रवास बनला त्रासदायक; अतिरिक्त जनरल डब्यांची मागणी

लातूर-मुंबई रेल्वेत जनरल डबे अपुरे; प्रवासी हैराण

उभ्याने प्रवासाची वेळ; जनरल डब्यांसाठी प्रवाशांचा आक्रोश

लातूर, 01 जून (हिं.स.) - लातूर, बीड, धाराशिव आणि परिसरातील हजारो प्रवाशांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेषतः जनरल डब्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी पाहता प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सध्या उपलब्ध असलेले जनरल डबे अपुरे पडत असल्याने अतिरिक्त जनरल डबे वाढवावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सुट्टीचे दिवस, सण-उत्सव, भरती प्रक्रिया, शिक्षण आणि रोजगारासाठी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र रेल्वेत जनरल डब्यांची संख्या मर्यादित असल्याने अनेकांना उभ्याने किंवा दरवाज्यात लटकून प्रवास करावा लागत आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा रेल्वे स्थानकावर तासन्तास प्रतीक्षा करूनही डब्यात प्रवेश मिळत नाही. गर्दीमुळे भांडणे, ढकलाढकली आणि गैरसोयीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे अतिरिक्त जनरल डबे जोडण्याची मागणी केली आहे.

विशेषतः लातूर-मुंबई मार्गावर नियमित धावणाऱ्या गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या वाढवून सामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि व्यापारी वर्गाकडूनही ही मागणी सातत्याने होत असून रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande