
पुणे, 01 जून (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील मिती फिल्म सोसायटीच्या वतीने 'पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धा व महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी उपस्थित होते.
या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. समाजातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक विषयांवर आधारित दर्जेदार कलाकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेसाठी रील किंवा शॉर्ट फिल्म सादर करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी गुगल फॉर्मद्वारे प्रवेशिका आणि कलाकृती सादर कराव्यात. सामाजिक संदेश देणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या अधिकाधिक तरुणांनी तसेच चित्रपटप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षानिमित्त राबविलेल्या सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरी शिष्टाचार, स्व-बोध आणि पर्यावरण संरक्षण या 'पंचपरिवर्तन' विषयांवर आधारित कलाकृती स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार आहेत.
स्पर्धेच्या नियमांबाबत माहिती देताना चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सांगितले की, रील स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १५० रुपये असून रीलचा कालावधी कमाल ९० सेकंदांचा असावा. शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये असून चित्रपटाचा कालावधी कमाल १० मिनिटांचा असणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून आयोजकांनी गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहितीसाठी ८१४९२११२९९ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु