
पुणे, 01 जून (हिं.स.)औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या तळेगाव परिसरात रेल्वेच्या पुणे विभागाकडून नवीन मालधक्का (गुड्स शेड) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पुणे विभागातील रेल्वे मालवाहतुकीला गती मिळणार असून व्यापारी, व्यावसायिक तसेच औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.तळेगाव आणि चाकण परिसरात वाहन उद्योगांसह विविध उत्पादन क्षेत्रातील अनेक कंपन्या कार्यरत आहेत.
नवीन मालधक्का सुरू झाल्यानंतर या उद्योगांना कच्चा माल, पेट्रोलियम पदार्थ, साखर आणि इतर वस्तूंची वाहतूक अधिक सुलभ व जलदगतीने करता येणार आहे. त्यामुळे पुणे परिसरातील आयात-निर्यात व्यवहारांना चालना मिळण्याबरोबरच रेल्वेच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, नवीन मालधक्का उभारण्यासोबतच पुणे विभागातील सध्या कार्यरत १३ जुन्या मालधक्क्यांच्या पुनर्विकासाचे कामही रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. यामध्ये सासवड रोड, चिंचवड, बारामती, फुरसुंगी, लोणी, गुरमार्केट (कोल्हापूर), सांगली, मिरज, सातारा, कराड, लोणंद, कोपरगाव आणि श्रीगोंदा येथील मालधक्क्यांचा समावेश आहे.या प्रकल्पांमुळे रेल्वे मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढून उद्योग क्षेत्राला अधिक सक्षम वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु