
अमरावती, 01 जून (हिं.स.)।
विधान परिषद अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने अमरावतीच्या राजकीय मैदानात प्रचंड घडामोडी घडत असून महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. भाजपचे अधिकृत उमेदवार माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, दुसरीकडे शिंदेसेनेचे परभणी-हिंगोलीचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनीही अपक्ष म्हणून शड्डू ठोकत नामांकन दाखल केल्याने महायुतीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. बाजोरिया यांची ही अनपेक्षित एन्ट्री भाजप उमेदवारासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत धोकादायक मानली जात आहे.प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी महायुतीचे अनेक बडे नेते एकत्र आले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, प्रताप अडसड यांच्यासह शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू आणि महापौर श्रीचंद तेजवाणी प्रामुख्याने उपस्थित होते.
४ जून रोजी चित्र स्पष्ट होणार; फडणवीस-बावनकुळे 'अॅक्शन मोड'मध्ये?
आता सर्वांचे लक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेकडे लागले आहे. विप्लव बाजोरिया आपले नामांकन कायम ठेवतात की मागे घेतात, हे ४ जून रोजी स्पष्ट होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः या बंडखोरीत मध्यस्थी करणार आहेत. ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून बाजोरिया यांना उमेदवारी मागे घेण्यास लावणार का, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. जर बाजोरिया निवडणुकीच्या रिंगणात ठाम राहिले, तर महायुतीमधील दरी आणखी रुंदावण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी