जोगेश्वरीतील जयंत चाळीमधील रहिवाशांचे २१ वर्षानंतर घरांचे स्वप्न पूर्ण
मुंबई, 01 जून (हिं.स.) - गुंफा प्रतिबंधित क्षेत्रामुळे बाधित झालेले व गेली २१ वर्ष हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या जयंत चाळीतील कुटुंबाचे स्वप्न खासदार रविंद्र वायकर यांचा पाठपुरावा व प्रयत्नांमुळे सत्यात उतरले असून त्यांचे पुनर्वसन जोगेश्व
जयंत चाळ रहिवासी


मुंबई, 01 जून (हिं.स.) - गुंफा प्रतिबंधित क्षेत्रामुळे बाधित झालेले व गेली २१ वर्ष हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या जयंत चाळीतील कुटुंबाचे स्वप्न खासदार रविंद्र वायकर यांचा पाठपुरावा व प्रयत्नांमुळे सत्यात उतरले असून त्यांचे पुनर्वसन जोगेश्वरीतच करण्यात आले आहे. येथी ११ कुटुंबांना वायकर यांच्या हस्ते सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या के उत्तर कार्यालयात सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत सदनिकेच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

जोगेश्वरी येथील ऐतिहासिक जोगेश्वरी गुंफा प्रतिबंधित क्षेत्रामुळे गेल्या २१ वर्षांपासून रखडलेल्या पुनर्वसनाचा आणि बेघर झालेल्या शेकडो कुटुंबांचा प्रश्न गंभीर बनला होता. जोगेश्वरी गुंफा परिसरामध्ये गेल्या ५० ते ६० वर्षांपासून मोठी लोकवस्ती आहे. येथील चाळींच्या पुनर्वसनाचे काम एका खाजगी विकासकामार्फत सुरू होते. मात्र, एका जनहित याचिकेवरील उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, जोगेश्वरी गुंफा ही 'भारतीय पुरातत्व विभागाच्या' प्राचीन व पुरातन वास्तू अंतर्गत दर्जा १ मध्ये समाविष्ट करण्यात आली. या नियमामुळे गुंफेपासून १०० मीटर परिसरात कोणत्याही बांधकामास परवानगी नाकारण्यात आली होती. न्यायालयीन नियमांच्या तांत्रिकतेमुळे विकासकाने गृहप्रकल्पाचे काम अर्धवट स्थितीत सोडून दिल्याने जमुना चाळ, जयंत निवास आणि ब्राह्मण वाडी या परिसरांचा विकास पूर्णपणे रखडला. त्यामुळे गेल्या २१ वर्षांपासून येथील कुटुंबे हक्काच्या घराशिवाय निराधार आणि बेघर झाली आहेत. जयंत चाळ येथील एकूण २६ बांधकामांपैकी ९ अनिवासी व १७ निवासी घरे, तर जमुना निवासमधील एकूण १९ बांधकामांपैकी १५ निवासी व ४ अनिवासी घरे न्यायाच्या प्रतीक्षेत होती.

स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या भागातील येथील निराधार कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी विधानसभेत लक्षवेधी, तारांकित प्रश्न आधी विविध लोकशाही आयुधांच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष ही वेधले. एस.आर.एचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी यांचा समवेत बैठकाही घेतल्या. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या समस्येत तातडीने लक्ष घालण्याची भेट घेऊन मागणी केली होती. विधिमंडळात उपमुख्यमंत्री तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री यांनी त्या बेघर कुटुंबाना पीएपी देण्याचे निर्देश एसआरएला दिले होते. त्यानुसार जयंत चाळीतील त्या बेघर कुटुंबाना अंधेरी छाया एसआरए सह. गृह.संस्था, अंधेरी (पूर्व) व पंचरत्न एसआरए सह. गृह.संस्था,

गोरेगाव (पूर्व) येथील घरांच्या चाव्यांचे वाटप

महानगरपालिकेच्या के उत्तर येथील कार्यालयात करण्यात आले. या ११ कुटुंबांमध्ये विनिता मंत्रवडी, झूमकूबाई सोलंकी, नवीनचंद्र संझगिरी, सुभाष शिर्सेकर, चंपकलाल सोनी, अनुजा सामंत, विनोदकुमार शहा, रिचर्ड पिंटो, सोनाली थत्ते, मुलचंद राठोड यांचा समावेश आहे. मुंबई महानगर पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार या अगोदरची येथील काही रहिवाश्याचे आजगावकर प्लॉट (६०), नवजीवन नगर (बोरिवली-पूर्व) (१८७), चिकूवाडी (बोरिवली-पश्चिम) (७६) व लालजीपाडा (कांदिवली-पश्चिम ) येथे (८६) कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

यावेळी सहाय्यक आयुक्त रुपाली कदम, कार्यकारी अभियंता, इमारत व कारखाने विभागाचे अधिकारी सचिन कुलकर्णी, विभागप्रमुख द्यानेश्वर सावंत, प्रियांका आंबोळकर, शाखा प्रमुख बंटी सावंत, अनिरुद्ध नारकर, शाखा प्रमुख बंड्या सावंत, बाळकृष्ण जोशी, माजी नगरसेवक रेखा रामवंशी, हुसेन करोडी, मनोज सातारकर, प्रिया धोत्रे, मनीषा वायकर, दीप्ती वायकर पोतनीस, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande