
डोंबिवलीत ४० महिलांकडून पवमान सूक्ताचे सामूहिक पठण
डोंबिवली, 01 जून (हिं.स.) : अधिकमासाच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असताना डोंबिवलीत एका आगळ्यावेगळ्या वैदिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीकांत पावगी आणि शुभदा पावगी यांच्या पुढाकारातून पूर्वेकडील सर्वेश सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तब्बल ४० महिलांनी पवमान सूक्ताचे सामूहिक पठण करून उपस्थितांना वैदिक परंपरेचा अनोखा अनुभव दिला.
शोभना फडके आणि गौरी खुंटे यांच्या शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाखाली महिलांनी पवमान सूक्ताचे पठण केले. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आणि सूक्ताचा अर्थ जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. धार्मिक आणि वैदिक सूक्तांच्या पठणाचे प्रशिक्षण वर्ग डोंबिवलीत गेली अनेक वर्षे सुरू असून, त्यामध्ये महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.ऋग्वेदातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे पवमान सूक्त हे शुद्धीकरण, पावित्र्य आणि आध्यात्मिक उन्नतीशी संबंधित आहे. ‘पवमान’ म्हणजे पवित्र करणारा किंवा शुद्ध करणारा. या सूक्तामध्ये सोमदेवतेचे स्तवन करण्यात आले असून वैदिक परंपरेत त्याला विशेष स्थान आहे. शास्त्रीय आणि वैदिक पार्श्वभूमी असलेल्या या सूक्ताचे पठण आव्हानात्मक मानले जाते. त्यामुळे अशा सामूहिक पठण उपक्रमांना धार्मिक अभ्यासक आणि भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
कार्यक्रमादरम्यान डॉ. शुभदा जोशी यांनी पवमान सूक्ताचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.गेली पाच दशके सामाजिक, सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रात सक्रिय असलेले श्रीकांत पावगी आणि शुभदा पावगी यांनी या कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि प्रभावी आयोजन केले होते. कार्यक्रमाला शहरातील शैक्षणिक, साहित्यिक, संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.माधव जोशी, डॉ. संदीप घरत, डॉ. मंजिरी घरत, श्रीराम सिधये, डॉ. महेश ठाकूर आदी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत पावगी कुटुंबियांचे अभिनंदन केले. वैदिक परंपरेचे संवर्धन आणि महिलांचा वाढता सहभाग यामुळे हा कार्यक्रम विशेष ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi