सोलापूर-गोवा विमानसेवेला तुफान प्रतिसाद; १० जूनपर्यंत बहुतेक आसने फुल्ल
सोलापूर, 01 जून (हिं.स.)।सोलापूर-गोवा विमानसेवेला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून १० जूनपर्यंतची बहुतांश आसने पूर्णपणे आरक्षित झाली आहेत. वाढत्या मागणीमुळे या मार्गावरील विमान तिकिटांचे दर २,७०० रुपयांपासून थेट १२ हजार रुपयांपर्यंत प
Air Plane


सोलापूर, 01 जून (हिं.स.)।सोलापूर-गोवा विमानसेवेला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून १० जूनपर्यंतची बहुतांश आसने पूर्णपणे आरक्षित झाली आहेत. वाढत्या मागणीमुळे या मार्गावरील विमान तिकिटांचे दर २,७०० रुपयांपासून थेट १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

सोलापूर विमानतळावरून फ्लाय कंपनीमार्फत सुरू करण्यात आलेल्या या विमानसेवेला ९ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षभरात १४ हजारांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असून, सुरुवातीपासूनच प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद कायम आहे.

विशेषतः डिसेंबर-जानेवारी या पर्यटन हंगामानंतर मे आणि जून महिन्यातील उन्हाळी सुट्ट्यांमध्येही या विमानसेवेचे बुकिंग शंभर टक्के भरत असल्याचे दिसून येत आहे. सध्या गोव्याला जाण्यासाठी तिकिटे केवळ राखीव कोट्यातून उपलब्ध होत असून त्यासाठी प्रवाशांना जास्तीची किंमत मोजावी लागत आहे.

गोवा विमानसेवा हैदराबादमार्गे चालवली जात असल्याने हैदराबादसाठीही प्रवाशांची संख्या वाढली आहे. सेवा उपलब्ध असलेल्या दिवशी हैदराबादला जाणारे किंवा तेथून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण ४० ते ६० टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे.

उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम आणि वेळेची मोठी बचत यामुळे गोवा पर्यटनासाठी सोलापूरकरांची पहिली पसंती विमानप्रवासाला मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande