
मुंबई, 1 जून (हिं.स.) । जलसाक्षरता आणि पावसाचे पाणी साठवण्याबाबतचे नियोजन करण्याबाबतचे विशेष सत्र येत्या १४ जून रोजी मुंबईत मुलुंड येथे आयोजित करण्यात आले आहे.
पाणी हे जीवन आहे, परंतु सध्या सर्वच जण जलसंकटाचा सामना करत आहेत. भूजलाची घटती पातळी आणि पाण्याची वाढती गरज पाहता सोसायटीत, इमारतीत, घरांवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाथेंबाचे नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे.सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून, जलवर्धिनी प्रतिष्ठान संचालित जल ज्ञान केंद्र कार्यक्रमांतर्गत एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.पावसाच्या पाण्याचे नियोजन (Rainwater Harvesting) (जर आपल्या सोसायटीचे क्षेत्रफळ २,००० चौ. मी. असेल, तर वर्षाला साधारण ४० लाख लिटर पाणी आपल्याला विनामूल्य मिळू शकते. हे पाणी कसे साठवायचे व वापरायचे याचे सविस्तर मार्गदर्शन), विहीर व बोअरवेल पुनर्भरण (विहिरीच्या पाण्याचा योग्य वापर आणि शास्त्रीय पद्धतीने पुनर्भरण (Refilling) करण्याची तंत्रे), सांडपाण्याचा पुनर्वापर (सांडपाण्याचा पुनर्वापर करून खर्च कसा वाचवायचा याची माहिती) या विषयावर मार्गदर्शन केले जाईल.
मुलुंडमधील केळकर कॉलेजमध्ये राबवलेल्या जलसाठवणीच्या यशस्वी प्रकल्पाची पाहणी करण्याची व्यवस्था केली जाईल.अशा प्रकल्पांसाठी प्रतिष्ठानतर्फे आवश्यक ते तांत्रिक साहाय्यदेखील उपलब्ध करून दिले जाईल.मुलुंडमधील मिठागर महापालिका शाळेच्या सभागृहात १४ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता हे सत्र सुरू होईल.जलवर्धिनी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या सत्रात, अभियंता उल्हस मुकुंद परांजपे (पावसाच्या पाण्याचे नियोजन सल्लागार) मार्गदर्शन करणार असून सत्राचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, घाटकोपर विभागाचे सहकार्यवाह अभियंता सचिन शेणोलीकर भूषविणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
आपल्या सोसायटीला पाणी बचतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी