
परभणी, 01 जून (हिं.स.)।
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसच्या नेतेमंडळींसह महापालिकेतील सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफीज, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, नगरसेवक नदिम इनामदार, गणेश देशमुख, गुलमिर खान, सुनिल देशमुख, जि.प. सदस्य अजित वरपुडकर यांच्यासह मोहसीन खान (अड्डू भाई), नईम भाई, विखार इलाही, मुसुद्दीन खान आणि असंख्य कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. यावेळी बोलताना सुशील देशमुख यांनी ही निवडणूक केवळ राजकीय लढाई नसून जनसेवेची जबाबदारी असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून सर्वसामान्य जनतेशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. त्यामुळे जनतेच्या समस्या आणि अपेक्षा जवळून समजल्या असून त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची संधी या निवडणुकीमुळे मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेचे प्रेम, सहकार्य आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन हेच आपल्या कार्याचे खरे बळ असल्याचे नमूद करत देशमुख यांनी मतदारसंघातील सर्व मान्यवर, सहकारी, समर्थक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच आगामी काळात मतदारसंघाच्या विकासासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आणि लोकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. सुशील देशमुख यांच्या उमेदवारीमुळे परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis