
- ४९८ ठिकाणी १२ जूनला निघणार सोडत
अमरावती, 01 जून (हिं.स.)।
जिल्ह्यात एकीकडे विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरt असतानाच ग्रामपंचयत निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात प्रशासक असलेल्या तब्बल ४९८ ग्रामपंचायतींमध्ये येत्या १२ जून रोजी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. यादिवशी ग्रामपंचायतींमध्ये आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढली जाणार असल्याने इच्छुकांचे हार्टबीट वाढले आहे. यामध्ये बिगर व अंशतः अनुदानित ग्रामपंचायतींचा समावेश नसल्याने चिखलदरा तालुक्यातील २३ व धारणीमधील ३५, अशा एकूण ५९ ग्रामपंचायती वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासकराज असलेल्या ५५८ पैकी ४९८ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणाची सोडत निघणार आहे. अनुसूचित जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि महिला, अशा गटांमध्ये आरक्षण काढले जाणार आहे. यामध्ये ओबीसींच्या जागांचासुद्धा समावेश राहणार आहे. वेळापत्रकानुसार आठ जूनला विशेष ग्रामसभेची सूचना देणे, १२ जूनला विशेष ग्रामसभा बोलविणे, १९ जूनला आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे, १९ ते २४ जूनला हरकती व सूचना, आठ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता व १० जुलैला जिल्हाधिकाऱ्यांद्वारे प्रसिद्धी, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आला आहे. अचलपूर तालुक्यातील ४३, दर्यापूर ४९, अंजनगावसुर्जी ३४, अमरावती ४६, भातकुली ३६, नांदगाव खंडेश्वर ५१, चांदूररेल्वे ३०, धामणगावरेल्वे ५५, तिवसा ३०, वरुड ४१, मोर्शी ३९, चांदूरबाजार तालुक्यातील ४१ ग्रा.पं.मध्ये निवडणुका होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी