
उन्हाळी ॲथलेटिक्स प्रशिक्षण शिबिरात ६९ खेळाडूंचा सहभाग
नाशिक, 01 जून (हिं.स.)
पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथील आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत आदिवासी विकास विभाग आणि 'स्ट्राइड्स फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमानाने विशेष 'उन्हाळी ॲथलेटिक्स प्रशिक्षण शिबिरा'चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे उदयोन्मुख आदिवासी खेळाडूंसाठी नवे दालन खुले होणार आहे. त्यांच्या क्रीडा कौशल्यांना नवी झळाळी मिळणार आहे. उन्हाळी ॲथलेटिक्स प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सोमवारी (दि.१) अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी क्रीडा अधिकारी क्रांती बनकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी लता चव्हाण, आर. के. तडवी, सुनील नेरकर, निर्मला सावंत, नामदेव भांगरे आदी उपस्थित होते. या शिबिरात एकूण ६९ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला आहे, ज्यामध्ये ३६ विद्यार्थी आणि ३३ विद्यार्थीनींचा समावेश आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळाडूंना आपल्या कौशल्यात सुधारणा करण्याची ही एक उत्तम संधी शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या शिबिरामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, त्यांच्यातील स्पर्धात्मक क्षमता अधिक प्रगल्भ होईल. तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या उपक्रमातून भविष्यात अनेक दर्जेदार खेळाडू तयार होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आदिवासी विकास विभागाचा हा उपक्रम क्रीडा संस्कृतीला बळकटी देणारा असून, खेळाडूंसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.
चौकट
आदिवासी क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून खेळाडूंना केवळ उत्तम सुविधाच मिळत नाहीत, तर त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठीची योग्य दिशाही मिळते. शिस्तीचे पालन, सराव आणि जिद्द या गुणांच्या जोरावर खेळाडू निश्चितपणे आपल्या स्वप्नांची पूर्तता करू शकतात. हे शिबिर केवळ एक प्रशिक्षण नसून ती भविष्यातील यशस्वी खेळाडू घडवणारी एक कार्यशाळा आहे.-दिनकर पावरा, अपर आयुक्तआदिवासी विकास विभाग
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV