
अमरावती, 01 जून (हिं.स.)।
चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यातील जंगलात तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांवर हल्ला करून ठार करणाऱ्या जहाल वाघीणीला आज परतवाड्यात आणण्यात आले आहे. या वाघिणीला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलात सोडले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. चार महिलांना ठार करणारी वाघीण परतवाड्यात आणल्यानने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे या वाघिणीला परतवाड्याला आणले मात्र तिला कोणत्या जंगलात सोडायचे हे अद्याप ठरले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तेंदूपत्ता संकलनाकरिता जंगलात गेलेल्या सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या गुंजेवाही गावातील एकूण चार महिलांवर सदर वाघीणीने हल्ला करून त्यांना ठार केले होते. 22 मे रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. यानंतर वन विभागाने या वाघिणीला पकडण्याकरिता मोठे प्रयत्न केले. जंगलात ज्या भागात वाघीण होती, त्या भागात चार पिंजरे आणि 20 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. यासोबतच मोशन सेन्सर लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले होते. वन विभागाच्या पथकाने 24 मे रोजी या वाघिणीला पकडण्यात यश मिळवले. गोरेवाडा पार्क इथे या वाघिणीला नेले जाणार असे सांगितले जात होते. मात्र या वाघिणीला परतवाडा येथे आणण्यात आले आहे. आता या वाघिणीला मेळघाटच्या अकोट वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागाच्या जंगलात सोडणार अशी चर्चा पसरली आहे. या चर्चेने अनेकांना धडकी भरली आहे. वाघिणीला सध्या परतवाडा वन्यजीव विभागाच्या परिसरात ठेवले आहे.
अद्याप निर्णय नाही
या वाघिणीला काही दिवस परतवाडा येथेच ठेवले जाणार आहे. तिला नेहमीसाठी कुठे ठेवायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे वन्यजीव विभाग परतवाडा येथील सहाय्यक वनरक्षक विक्रम शिंदे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी