
सोलापूर, 01 जून (हिं.स.)। महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन साधारणपणे १० ते १५ जूनदरम्यान होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असली, तरी यंदा ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणीसाठा उणे २१ टक्क्यांपर्यंत घसरल्याने १० जूननंतर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
गतवर्षी चांगल्या पावसामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले होते. डिसेंबरअखेर धरणात ११३ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होता. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिरिक्त पाणी नदीपात्रातून सोडावे लागले होते. मात्र, यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात शेतीसाठी सलग दोन महिने धरणातून पाणी सोडण्यात आले. तसेच २३ एप्रिल रोजी भीमा नदीतही पाणी सोडण्यात आले होते.
सध्या कालवे आणि नदीमार्गे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून करकंब परिसरातील कालव्यात सुरू असलेला पुरवठादेखील १० जूननंतर थांबविण्यात येणार आहे. त्यानंतर धरणातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्याच्या गरजांसाठी राखून ठेवला जाणार आहे.
१ मे रोजी उजनी धरणात ५५.५७ टीएमसी मृत पाणीसाठा म्हणजेच उणे १५.११ टक्के पाणी उपलब्ध होते. मात्र महिन्याभरातच हा साठा कमी होऊन ३१ मे रोजी ५२.४१ टीएमसी म्हणजे उणे २१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाल्यानेही पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे.
दरम्यान, मॉन्सून उशिरा येण्याची शक्यता आणि कमी पावसाचा अंदाज लक्षात घेता प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. भविष्यात पाऊस आणखी लांबल्यास भीमा नदीत पाणी सोडण्याची गरज निर्माण झाल्यास त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य शासन घेईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड