
अमरावती, 01 जून (हिं.स.)।
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अधिकृतपणे एन्ट्री करत निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. पक्षाच्या वतीने वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तसेच नगरसेवक निलेश विश्वकर्मा यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्यवर्धन पुंडकर, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उमेदवाराला पाठिंबा दर्शविला. अर्ज दाखल केल्यानंतर निलेश विश्वकर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधताना निवडणुकीतील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र पैशाच्या जोरावर नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना भेडसावणाऱ्या समस्या, प्रलंबित विकासकामे आणि निधीअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे विश्वकर्मा यांनी नमूद केले. सर्व नगरसेवकांच्या विकासकामांना गती देण्यासाठी सक्षम प्रतिनिधी म्हणून आपण विधान परिषदेत जाण्याची इच्छा व्यक्त केली.वंचित बहुजन आघाडीने उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे या निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांबरोबरच आता वंचित बहुजन आघाडीचीही ताकद या निवडणुकीत पणाला लागणार आहे. त्यामुळे अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. राजकीय वर्तुळातही या उमेदवारीची चर्चा रंगू लागली असून आगामी काळातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी