अमरावतीतील थिलोरीत नागरी समस्यांवर ग्रामस्थ आक्रमक
- ८ दिवसांत कामे न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा अमरावती, 01 जून (हिं.स.)। तालुक्यातील थिलोरी येथे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही थिलोरी गावातील नालेसफाई, लेंडी नाल्याचे खोलीकरण, जंतुनाशक फवारणी, स्ट्रीट लाईट व्यवस्था व शेतरस्त्यांच्य
अमरावतीतील थिलोरीत नागरी समस्यांवर ग्रामस्थ आक्रमक


- ८ दिवसांत कामे न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा

अमरावती, 01 जून (हिं.स.)।

तालुक्यातील थिलोरी येथे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही थिलोरी गावातील नालेसफाई, लेंडी नाल्याचे खोलीकरण, जंतुनाशक फवारणी, स्ट्रीट लाईट व्यवस्था व शेतरस्त्यांच्या दुरुस्तीची कामे प्रलंबित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत थिलोरीचे सचिव पी. एन. चारथड यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी केली.निवेदनात गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या लेंडी नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झुडपे साचल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गावातील अनेक नाल्यांची साफसफाई न झाल्याने सांडपाणी साचत असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने नालेसफाई, जंतुनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील परिसरासह गावातील अनेक भागांत स्ट्रीट लाईटची सुविधा नसल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. थिलोरी–गणेशपूर मार्गासह अनेक शेतरस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. पद्माताई चुडे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर टीका करत, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनीही त्यांच्या पुतळा परिसरातील नालीची साफसफाई करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत जर इतकी साधी जबाबदारी पार पाडू शकत नसेल, तर गावातील स्वच्छता व विकासकामांबाबत काय अपेक्षा ठेवायची?” असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, निवेदनातील मागण्यांवर आठ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही न झाल्यास ९ जून २०२६ पासून पंचायत समिती, दर्यापूर येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

यावेळी निवेदन देताना प्रामुख्याने अमित पाटील होले, इंजी. अनिकेत वाकपांजर, नंदकिशोर पाटील टापरे, अनिल पाटील होले, गौतम वाकपांजर, सतीश चुडे, प्रमोद पाटील होले, बाबुलाल राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande