पंढरपुरात भक्तीला प्राधान्य; विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी संस्कृतीला पूर्णविराम
सोलापूर, 01 जून (हिं.स.)। पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय घेण्यात आला आहे की, पूजेच्या आणि महानैवेद्याच्या वेळी दर्शन रांगेतील सर्वसामान्य भाविकांना देवासमोर बसून दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. मंदिर समितीच्या
Vithal


सोलापूर, 01 जून (हिं.स.)। पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय घेण्यात आला आहे की, पूजेच्या आणि महानैवेद्याच्या वेळी दर्शन रांगेतील सर्वसामान्य भाविकांना देवासमोर बसून दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. मंदिर समितीच्या या ऐतिहासिक निर्णयाचे वारकरी आणि भाविकांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

या निर्णयामुळे मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पूर्वी सर्वसामान्य भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी ८ ते १० तास रांगेत थांबावे लागत होते. मात्र, नव्या व्यवस्थेमुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान झाली असून भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळू लागले आहे.

विशेष म्हणजे मंदिरातील दैनंदिन धार्मिक विधी, पूजा आणि महानैवेद्याच्या वेळी दर्शन रांगेत असलेल्या भाविकांनाच थेट विठ्ठलाच्या समोर बसण्याचा मान दिला जाणार आहे. पूर्वी या जागांवर प्रामुख्याने लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर बसत असत. आता त्याच ठिकाणी सामान्य वारकरी आणि भाविक विठ्ठलाचे सान्निध्य अनुभवताना दिसणार आहेत.

या बदलामुळे वारकरी संप्रदायात समाधानाचे वातावरण असून अनेक भाविकांनी याला भक्तीतील समानतेचा विजय असे संबोधले आहे. आज खऱ्या अर्थाने आम्हाला आमचा विठू माऊली भेटला, अशा भावना व्यक्त करत वारकऱ्यांनी मंदिर समितीच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

भक्तीमध्ये सर्वजण समान असल्याचा संदेश देणारा हा निर्णय विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भाविकांच्या धार्मिक अनुभवाला अधिक आत्मीयता आणि जवळीक देणारा ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande