
लातूर, 01 जून (हिं.स.) : श्री औसा हनुमान देवस्थान येथे रविवारी सकाळी दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताला अचानक हृदयविकाराचा झटका आला. या गंभीर प्रसंगी प्रसंगावधान राखत एका युवकाने तत्काळ सीपीआर देऊन संबंधित व्यक्तीचा जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री औसा हनुमान देवस्थान परिसरात दर्शनासाठी आलेल्या व्यक्तीची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, परिसरातील युवक चैतन्य सदरे यांनी धाडस आणि तत्परता दाखवत संबंधित व्यक्तीला तातडीने सीपीआर दिला.
चैतन्य यांच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांचा जीव वाचवण्यात यश आले. त्यांच्या या धाडसी आणि मानवतावादी कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या घटनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत सीपीआरचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. चैतन्य सदरे यांच्या प्रसंगावधानामुळे एक अमूल्य जीव वाचला असून, त्यांच्या कार्याची परिसरात विशेष चर्चा होत आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis