
सोलापूर, 01 जून (हिं.स.)। पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्राशनामुळे २४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभर हातभट्टीच्या अवैध व्यवसायाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात आजही ५४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी दारू अर्थात हातभट्टीची निर्मिती होत असून तिचा पुरवठा ३०० हून अधिक गावांपर्यंत केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, या अवैध व्यवसायाची संपूर्ण माहिती ग्रामीण पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे उपलब्ध आहे. हातभट्टी निर्मितीची ठिकाणे तसेच अवैध विक्री होणाऱ्या गावांची यादीही संबंधित यंत्रणांनी तयार केली आहे. त्यानुसार ग्रामीण पोलिसांकडून ‘ऑपरेशन परिवर्तन’, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘हातभट्टीमुक्त गाव’ अभियान राबविले जात आहे.
दरवर्षी या मोहिमांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली जाते. त्यामध्ये सरासरी साडेसात लाख लिटर गुळमिश्रित रसायन आणि सुमारे ४० हजार लिटर हातभट्टी नष्ट करण्यात येते. मात्र, या कारवायांनंतरही जिल्ह्यातील हातभट्टीचा व्यवसाय पूर्णपणे बंद झालेला नाही.
कारवाईदरम्यान अनेकवेळा रसायनयुक्त गावठी दारू नव्या बाटल्यांमध्ये भरून त्यावर नामांकित कंपन्यांची बनावट लेबले आणि बूच लावल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असून विषारी दारू दुर्घटनांसारख्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पुण्यातील दुर्घटनेनंतर सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टी निर्मिती आणि विक्रीवर अधिक कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी संबंधित यंत्रणांनी केवळ मोहिमा न राबवता या अवैध साखळीचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड