
-भारताला २२ व्या आशियाई अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १० सुवर्णपदकांसह एकूण १९ पदके
नवी दिल्ली, 01 जून (हिं.स.)२२ व्या आशियाई अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण १९ पदके जिंकली. भारतीय संघाने १० सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकून पदक तालिकेत दुसरे स्थान पटकावले. यजमान चीनने १४ सुवर्णांसह २५ पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर जपान १८ पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. भारतीय खेळाडूंच्या या प्रभावी कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर भारतीय संघाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, २२ व्या आशियाई अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १० सुवर्णांसह १९ पदके जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. ही प्रभावी कामगिरी आपल्या तरुण खेळाडूंचा दृढनिश्चय आणि उत्कृष्टता दर्शवते. मला आशा आहे की त्यांची ही कामगिरी येत्या काळात अधिक तरुण भारतीयांना खेळात येण्यासाठी प्रेरणा देईल. पंतप्रधानांचा हा संदेश भारतीय ॲथलेटिक्ससाठी एक मोठे यश म्हणून पाहिला जात आहे.
चॅम्पियनशिपच्या अखेरत्या दिवशी तीन सुवर्णपदके जिंकून भारताने आपल्या मोहिमेचा शानदार समारोप केला. सर्वात संस्मरणीय कामगिरी महिलांच्या ४x४०० मीटर रिले संघाने केली. नीरू पाठक, भूमिका संजय नेहते, ताहुरा खातून आणि सेहनूर बावा या चौघींनी ३:३८.०७ सेकंदांची वेळ नोंदवून एक नवीन चॅम्पियनशिप विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी स्पर्धेतील सर्वात मोठ्या आकर्षणांपैकी एक होती. मुस्कानने महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत १६:५३.०८ वेळेसह सुवर्णपदक जिंकले. व्यंकटरम रेड्डी मोगली यांनीही पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत १:४८.२७ या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदक पटकावले.
मैदानी स्पर्धांमध्ये, निश्चयने पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात ६०.१० मीटर थाळी फेकून रौप्यपदक जिंकले. हा एक नवीन भारतीय २० वर्षांखालील राष्ट्रीय विक्रमही आहे. यासह, तो या प्रकारात ६० मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. महिलांच्या ४x१०० मीटर रिले संघानेही उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. काजल हिराभाई वाजा, भावना जी, आरती आणि निपाम यांनी ४५.०५ सेकंदांची वेळ नोंदवून भारताला दुसरे स्थान मिळवून दिले.
भारतीय खेळाडूंनी या चॅम्पियनशिपमध्ये केवळ पदकेच जिंकली नाहीत, तर अनेक राष्ट्रीय आणि चॅम्पियनशिप विक्रमही प्रस्थापित केले. यावरून हे स्पष्ट झाले की, भारतीय खेळाडूंची नवी पिढी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवण्यासाठी सज्ज आहे. पंतप्रधान मोदींच्या संदेशानेही या विश्वासाला बळकटी दिली आहे की, भारताचे तरुण खेळाडू येत्या काळात जागतिक स्तरावर देशाची प्रतिष्ठा आणखी उंचावतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे