
अथेन्स, 02 जून (हिं.स.)भारताची तरुण कार्ट ड्रायव्हर, अतिका मीरने, 'चॅम्पियन्स ऑफ द फ्युचर अकॅडमी' कार्यक्रमाच्या दुसऱ्या फेरीत पात्रता फेरी, हीट रेसेस आणि अंतिम फेरी जिंकून आपल्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी कामगिरी केली. आणि जागतिक मोटरस्पोर्टच्या मंचावर आपले कौशल्य दाखवले. फॉर्म्युला वन अकॅडमीच्या पाठिंब्याने, ११ वर्षीय अतिकाने ओके-एनजे (१२-१४ वर्षे वयोगट) मधील अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्रात वर्चस्व गाजवले. या गटातील तिच्या पदार्पणाच्या हंगामात, तिने अनेक अनुभवी पुरुष ड्रायव्हर्सना आव्हान देत या स्पर्धेत आपला वेगळा ठसा उमटवला.
अतिका आपल्या प्रतिस्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे राहिली. तिच्या कामगिरीमुळे ती या मालिकेच्या इतिहासात पात्रता फेरी, हीट आणि अंतिम फेरी जिंकणारी केवळ तिसरी ड्रायव्हर ठरली. फेरी २.२ च्या अंतिम फेरीत, तिने दुसऱ्या क्रमांकावरील ड्रायव्हरवर २.६ सेकंदांपेक्षा जास्त फरकाने विजय मिळवला. मोटरस्पोर्टमध्ये हा फरक महत्त्वपूर्ण मानला जातो, विशेषतः जेव्हा सर्व २५ ड्रायव्हर्स एकसारखीच वाहने वापरत असतात. मुंबईत जन्मलेल्या आणि जम्मू आणि काश्मीरशी कौटुंबिक संबंध असलेल्या अतिकाने ५६.७७ सेकंदांच्या विक्रमी वेळेसह पात्रता फेरीत पोल पोझिशन मिळवली. ती दुसऱ्या क्रमांकावरील ड्रायव्हरपेक्षा अंदाजे ३.१९ सेकंद पुढे होती.
हीट रेस १ मध्ये तिने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. हीट रेस २ मध्येही अतिकाने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यावर एका सेकंदापेक्षा जास्त फरकाने विजय मिळवला आणि अंतिम फेरीसाठी ग्रिडवर पहिले स्थान मिळवले. १५ लॅपच्या अंतिम फेरीत, तिने सुरुवातीपासूनच नियंत्रण मिळवले आणि केवळ आठ लॅपमध्ये ३.९ सेकंदांची आघाडी घेतली.
आपल्या विजयानंतर अतिका म्हणाली, ट्रॅक खूप कठीण आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक होता, पण मी सर्व शर्यती जिंकण्यात यशस्वी झाले. जेव्हा भारताचे राष्ट्रगीत वाजले, तेव्हा मी खूप भावुक झाले. माझ्यासाठी यापेक्षा चांगली भावना असूच शकत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे