
जकार्ता, २ जून, (हिं.स.) - भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने महिला एकेरी गटात दणदणीत विजय मिळवून इंडोनेशिया ओपन २०२६ च्या अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. पुरुष एकेरीतील किदाम्बी श्रीकांत आणि महिला एकेरीतील मालविका बन्सोड यांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
दोन वेळेस ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूला थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानविरुद्ध कडवे आव्हान होते, पण तिने ५१ मिनिटांच्या सामन्यात २५-२३, २१-१६ असा विजय मिळवला. माजी विश्वविजेत्या सिंधूने या चुरशीच्या सामन्यात पहिला गेम जिंकला आणि त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तोच वेग कायम ठेवत सरळ गेममध्ये सामना जिंकला.
आता पुढील फेरीत तिचा सामना विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आन से-यंगशी होऊ शकतो. गेल्या आठवड्यात सिंगापूर ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधू अन से-यंगकडून पराभूत झाली होती. या दोघींमध्ये झालेल्या नऊ सामन्यांमध्ये सिंधूला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.
दुसरीकडे, माजी जागतिक क्रमांक एक किदाम्बी श्रीकांतचा प्रवास पहिल्याच फेरीत संपुष्टात आला. जपानच्या युशी तनाकाने त्याला २१-१९, २१-१५ असे पराभूत केले. महिला एकेरीमध्ये मालविका बन्सोडलाही पहिली फेरी पार करता आली नाही. सातव्या मानांकित थाई खेळाडू पोर्नपावी चोचुवोंगने तिला २१-१२, २१-१० असे पराभूत केले.
पुरुष दुहेरीमध्ये भारताला यश मिळाले. हरिहरन आमसाकरुणन आणि एम.आर. अर्जुन या जोडीने मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरीन अयुब आणि टॅन वी किओंग यांना २१-१८, २१-१० असे पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे