गैरशैक्षणिक कामांच्या वाढत्या ओझ्यामुळे शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सोलापूर, 0१ जून (हिं.स.) : राज्यातील शिक्षकांवर वाढत चाललेल्या गैरशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याची चिंता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. अध्यापनासोबतच विविध शासकीय जबाबदाऱ्यांचा वाढता
Jan gangna


सोलापूर, 0१ जून (हिं.स.) : राज्यातील शिक्षकांवर वाढत चाललेल्या गैरशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याची चिंता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. अध्यापनासोबतच विविध शासकीय जबाबदाऱ्यांचा वाढता भार शिक्षकांवरील तणाव अधिक वाढवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शिक्षकांचे मूलभूत कर्तव्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे असले, तरी प्रत्यक्षात त्यांचा मोठा वेळ बीएलओची जबाबदारी, जनगणना, विविध सर्वेक्षणे, ऑनलाइन माहिती भरणे, पोर्टल अद्ययावत करणे आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये खर्च होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे अपेक्षित लक्ष देणे कठीण होत असल्याची खंत शिक्षक व्यक्त करत आहेत.

सततचे ऑनलाइन अहवाल, वारंवार येणाऱ्या सूचना आणि विविध शासकीय मोहिमांशी संबंधित कामांमुळे शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्यातच उन्हाळी सुट्टीच्या काळातही शाळा पूर्वतयारी, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि ऑनलाइन नोंदींची कामे सुरूच राहत असल्याने शिक्षकांना आवश्यक विश्रांती मिळत नसल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागातील शिक्षकांसमोर इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या, तांत्रिक अडचणी आणि वेळेची मर्यादा ही अतिरिक्त आव्हाने आहेत. दिवसभर अध्यापन केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन माहिती भरण्याचे काम करावे लागत असल्याने मानसिक तणाव आणि थकवा वाढत असल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले आहे.

शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, शिक्षक मानसिकदृष्ट्या निरोगी आणि उत्साही असतील तरच विद्यार्थ्यांना प्रभावी, सकारात्मक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल. त्यामुळे शिक्षकांवरील गैरशैक्षणिक कामांचा बोजा कमी करून त्यांना मानसिक विश्रांती, कुटुंबासोबत वेळ आणि अध्यापनासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन त्यांच्यावरील अतिरिक्त प्रशासकीय जबाबदाऱ्या कमी करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शिक्षक संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande