
बीड, 10 जून (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरुषोत्तम पुरी येथे आज एक मोठी दुर्घटना टळली. सिंदफणा नदीच्या पात्रात भाविकांना घेऊन जाणारी एक बोट अचानक मध्यभागी उलटली. या बोटीमध्ये सुमारे ३५ भाविक स्वार होते. सुदैवाने, स्थानिक नागरिक आणि नावाड्यांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून सर्व भाविक थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे भाविक नदीपात्रातून बोटीने प्रवास करत होते. मात्र, नदीच्या मध्यभागात पोहोचताच बोटीचा तोल गेला आणि ती उलटली. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी (ओव्हरलोड) बसवले असल्यामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बोट उलटल्याचे पाहताच किनाऱ्यावरील स्थानिक नावाडी आणि ग्रामस्थांनी कसलाही विलंब न करता नदीत उड्या घेतल्या. अत्यंत वेगाने मदतकार्य सुरू करून त्यांनी पाण्यात बुडणाऱ्या सर्व ३५ भाविकांना सुखरूप बाहेर काढले.
या थरारक घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही भाविकांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी दाखवलेल्या या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis