जीएमसीतील गैरप्रकारावर युवक काँग्रेसचा घेराव; आंदोलनाचा धसका, दोषी कर्मचारी सक्तीच्या रजेवर
अकोला, 10 जून (हिं.स.)।सर्वोपचार रुग्णालयातील कथित गैरप्रकार आणि त्यासंदर्भातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसने बुधवारी तीव्र आंदोलन छेडत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. आमदार साजिद खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाल
Photo


अकोला, 10 जून (हिं.स.)।सर्वोपचार रुग्णालयातील कथित गैरप्रकार आणि त्यासंदर्भातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसने बुधवारी तीव्र आंदोलन छेडत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. आमदार साजिद खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक आकाश कवडे यांनी केले.

आंदोलनाचा वाढता रोष लक्षात घेत मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. संजय सोनूने यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित दोषी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले.आंदोलनानंतर आ. पठाण यांच्या उपस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी डॉ. सोनूने यांनी व्हायरल व्हिडिओतील प्रकाराबाबत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच रुग्णालयात घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याची कबुली देत प्रशासनाच्या वतीने रुग्णसेवेत सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचे सांगितले.

बैठकीत रुग्णसेवेतील त्रुटी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. रुग्णालयातील सेवा अधिक पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी आ. पठाण यांनी केली. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमुळे जीएमसीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. प्रशासनानेही भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आश्वासन दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande