
अकोला, 10 जून (हिं.स.) : अकोला शहरातील कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप करत नागरिकांनी आणि वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून घंटागाडी सेवा अनियमित असल्याने अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचत असून दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव यांनी सांगितले की, शहरातील अनेक भागांमध्ये चार ते सहा दिवस घंटागाडी फिरकत नाही. कोणत्याही भागासाठी निश्चित वेळापत्रक नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी घराघरांत कचरा साठत असून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता वाढली आहे.
नागरिकांनी आरोप केला आहे की, घंटागाडी सेवा विस्कळीत असतानाही कचरा संकलनासाठी 50 ते 100 रुपये तसेच विविध ठिकाणी अधिक शुल्क नियमितपणे वसूल केले जात आहे. रुग्णालये, अपार्टमेंट, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि सामान्य नागरिकांकडून शुल्क घेतले जात असले तरी अपेक्षित सेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सेवेत मनुष्यबळाची कमतरता, हेल्पर अपुरे असणे आणि निविदा प्रक्रियेतील विलंब यामुळे व्यवस्था कोलमडल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांना कारणे नको असून नियमित आणि प्रभावी सेवा मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. भविष्यात आरोग्य समस्या निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर असेल, असेही सांगण्यात आले.
महानगरपालिकेने तातडीने सर्व प्रभागांमध्ये नियमित घंटागाडी सेवा सुरू करावी, वेळापत्रक जाहीर करावे, पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत आणि शुल्क वसुलीत पारदर्शकता आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा निलेश देव यांनी दिला असून प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे