शेतकऱ्यांसाठी मोठी संधी: ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेत तब्बल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान
अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांचा योजनेंतर्गत समावेश वाढवण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार अमरावती, १० जून (हिं.स.) : राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा अधिकाध
शेतकऱ्यांसाठी मोठी संधी: ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेत तब्बल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान


अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांचा योजनेंतर्गत समावेश वाढवण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार

अमरावती, १० जून (हिं.स.) : राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा अधिकाधिक समावेश करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संच खरेदीसाठी विविध योजनांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना तब्बल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाणी बचत करणाऱ्या आधुनिक सिंचन पद्धतींचा लाभ कमी खर्चात मिळत असून शेती उत्पादन वाढविण्यास मदत होत आहे. विशेषतः अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध टप्प्यांमध्ये पूरक अनुदान देऊन आर्थिक दिलासा दिला जात आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारकांना 25 टक्के, तर इतर लाभार्थ्यांना 30 टक्के पूरक अनुदान मिळते.

याशिवाय जिल्हा परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारकांना 10 टक्के, तर इतर लाभार्थ्यांना 15 टक्के अतिरिक्त अनुदान दिले जाते. या सर्व योजनांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना एकूण 90 टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते.

या योजनेसाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीचा सातबारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे. तसेच शेतीसाठी ओलिताची सुविधा असणे बंधनकारक आहे. पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande