
गडचिरोली, 10 जून (हिं.स.)
अहेरी नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे (वय ३४) यांच्यावर आज(बुधवारी) सकाळी इंदाराम रोडवर लाकडी फळीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिक्रमित इमारत पाडल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले असून, या प्रकरणी अहेरी पोलिसांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह चौघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.या गंभीर घटनेची माहिती मिळताच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमी वैभव पांढरे यांची भेट घेतली आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहेरी येथील साई तीर्थ नगरीत राहणारे नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे हे आज, बुधवार दिनांक १० जून २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास इंदाराम रोडवर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. आबनपल्ली फाटा ते चेरपल्ली फाटा दरम्यान, प्रशांत भागवत यांच्या शेताजवळ आरोपींनी चारचाकी वाहनाने पांढरे यांना गाठले.अजय कंकडालवार यांच्या मालकीची अतिक्रमित इमारत प्रशासनाने पाडल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरून आरोपींनी संगनमत करून पांढरे यांना रस्त्यात अडवले, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी फळीने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात पांढरे यांच्या डोक्यावर, डोळ्याच्या वर कपाळावर आणि डाव्या हातावर गंभीर दुखापत झाली आहे.
चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल
जखमी वैभव पांढरे यांनी दिलेल्या बयानावरून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेखी अभिप्रायानंतर अहेरी पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
-
अजय कंकडालवार (अंदाजे वय ४५, रा. अहेरी)
-
पिंटू मडावी (अंदाजे वय ३५, रा. इंदाराम)
-
अजय नैताम (अंदाजे वय ३५, रा. इंदाराम)
-
एक अनोळखी इसम
नोंदवण्यात आलेली कलमे:
या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS 2023) च्या कलम १०९(१) (जिवे मारण्याचा प्रयत्न), ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) मंगेश वळवी यांनी दाखल केला आहे.
आरोपींच्या शोधासाठी ३ पोलीस पथके रवाना
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, फरार आरोपींचा तातडीने शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी पोलीस पथके तयार करण्यात आली असून त्यांना वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देवेंद्र पटले करत आहेत.या घटनेमुळे अहेरी परिसरात आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond