जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
अकोला, 10 जून (हिं.स.) : भारत सरकारच्या जनगणना संचालनालयाच्या निर्धारित कार्यक्रमानुसार अकोला महानगरपालिकेने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील काम नियोजित मुदतीपूर्वी पूर्ण करत राज्यातील महानगरपालिकांमध्ये दुसरा क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल महानगर
Photo


अकोला, 10 जून (हिं.स.) : भारत सरकारच्या जनगणना संचालनालयाच्या निर्धारित कार्यक्रमानुसार अकोला महानगरपालिकेने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील काम नियोजित मुदतीपूर्वी पूर्ण करत राज्यातील महानगरपालिकांमध्ये दुसरा क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली 1 मे 2026 रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रात जनगणना कार्यास सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान नियुक्त प्रगणकांनी घरभेटी देऊन नागरिकांची माहिती संकलित केली आणि घरगणना पूर्ण केली.

जनगणना संचालनालय महाराष्ट्राच्या निर्देशानुसार हे काम चार्ज अधिकारी, पर्यवेक्षक आणि प्रगणक यांच्या माध्यमातून पार पडले. अकोला महानगरपालिकेने निर्धारित कालावधीच्या अंतिम तारखेपूर्वीच काम पूर्ण केल्याने राज्यातील महानगरपालिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची नोंद झाली आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

या यशाबद्दल बुधवारी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांनी आपल्या दालनात शहर जनगणना अधिकारी आणि सर्व चार्ज अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी उर्वरित कालावधीत सादर करण्यात आलेल्या माहितीचे स्वनिरीक्षण करून तांत्रिक त्रुटी असल्यास त्या तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच, चार्ज अधिकारी, पर्यवेक्षक आणि प्रगणकांनी उन्हाची पर्वा न करता घराघरांत जाऊन यशस्वीपणे जनगणना पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande