
अकोला, 10 जून (हिं.स.) : अकोला महानगरपालिका पश्चिम झोन अंतर्गत डबकी रोड मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असलेल्या छाया हॉस्पिटलच्या अनधिकृत व अतिक्रमित बांधकामावर बुधवारी निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम झोन क्षेत्रीय कार्यालय आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम राबविली. रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित बांधकाम हटविण्यात आले.
या कारवाईदरम्यान सहाय्यक आयुक्त गजानन घोंगे, सहाय्यक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, कनिष्ठ अभियंता रविंद्र जाधव, समीर मालवे, रूपेश इंगळे, गुलाम मुस्तफा, सोनू गायकवाड, स्वप्नील पवार आणि आकाश धुळभरे यांनी सहभाग घेतला.
कायदो व सुव्यवस्था राखण्यासाठी डबकी रोड पोलीस ठाण्याचे एएसआय अफजल, एएसआय रंगारी, एलपीसी चराटे, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल आणि गोविंद यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती.
महानगरपालिका प्रशासनाने शहरातील विकासकामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात पुढेही अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे