सर्वोपचार रुग्णालय प्रकरण; दोन सुरक्षा रक्षक बडतर्फ, कक्षसेवक सक्तीच्या रजेवर
अकोला, 10 जून (हिं.स.) : सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेतील गंभीर त्रुटी उघड करणाऱ्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात प्रशासनाने प्राथमिक कारवाई करत दोन सुरक्षा रक्षकांची हकालपट्टी केली असून एका कक्षसेवकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात
Photo


अकोला, 10 जून (हिं.स.) : सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेतील गंभीर त्रुटी उघड करणाऱ्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात प्रशासनाने प्राथमिक कारवाई करत दोन सुरक्षा रक्षकांची हकालपट्टी केली असून एका कक्षसेवकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. या प्रकरणातील दोषींवर पुढील विभागीय चौकशीनंतर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी बुधवारी सर्वोपचार रुग्णालयात डीन डॉ. संजय सोनूने, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी डॉ. सोनूने यांनी घडलेल्या प्रकाराची कबुली देत चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

व्हायरल व्हिडिओमुळे प्रशासनावर टीका

गत आठवड्यात एका आदिवासी महिलेला आपल्या आजारी पतीला खांद्यावर उचलून उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची वेळ आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेमुळे सर्वोपचार रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर तीव्र टीका झाली होती. घटनेची माहिती मिळताच आमदार पठाण यांनी रुग्णालयाला भेट देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली होती.

यानंतर आमदार पठाण यांनी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. मंत्र्यांनी तत्काळ चौकशी समिती गठित करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

रुग्णसेवा सुधारण्यावर भर

बैठकीत आमदार पठाण यांनी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. रुग्णालयातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रुग्णसेवा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच प्रशासनाला काही सुधारणा उपाय सुचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीदरम्यान डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेण्यात आल्या. संबंधित प्रश्न मंत्रालय स्तरावर मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार पठाण यांनी दिले.

प्रश्नांच्या भडिमाराने प्रशासनाची कोंडी

आढावा बैठकीत आमदार पठाण यांनी प्रशासनाला अनेक प्रश्न विचारत जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या स्ट्रेचर आणि व्हीलचेअरची संख्या, स्वच्छतेसाठी मिळालेल्या निधीचा वापर, घटनेच्या दिवशी ड्युटीवर असलेले कर्मचारी, शासकीय समाजसेवकांची भूमिका तसेच वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध असतानाही शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार का केले जातात, यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी स्पष्टीकरण मागितले.

या प्रश्नांमुळे काही काळ प्रशासनाची चांगलीच कोंडी झाल्याचे बैठकीत दिसून आले. दरम्यान, या प्रकरणातील चौकशी अहवालानंतर आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande