
सोलापूर, 10 जून (हिं.स.)नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर महानगरपालिका कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या विविध ऑनलाइन सेवांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून नागरिकांना घरबसल्या अधिक कार्यक्षम सेवा मिळणार आहेत.महापालिकेकडून यापूर्वीच मालमत्ता कर भरणा, जन्म-मृत्यू दाखले, तक्रार निवारण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता या सेवांना एआय तंत्रज्ञानाची जोड देऊन त्या अधिक स्मार्ट आणि परिणामकारक बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एआयच्या साहाय्याने नागरिकांच्या तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण, तत्काळ नोंदणी, प्रलंबित कामांचा मागोवा तसेच विविध विभागांतील माहितीचे विश्लेषण करून निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे नियोजन आहे. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून नागरिकांचा वेळ आणि खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.महापालिकेच्या या डिजिटल परिवर्तनामुळे ‘स्मार्ट सोलापूर’ संकल्पनेला अधिक बळ मिळणार आहे. ऑनलाइन सेवांचा विस्तार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे सोलापूर महानगरपालिका राज्यातील तंत्रज्ञान-सक्षम आणि नागरिकाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अग्रस्थानी राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड