
लातूर, 10 जून (हिं.स.) : महिलांचे आरोग्य, आत्मविश्वास आणि सक्षमीकरण वाढविण्यासाठी सायकलिंग क्षेत्रात मुलींचा सहभाग प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी ‘अस्मिता वूमन लीग’ सायकलिंग स्पर्धा रविवार, 14 जून 2026 रोजी अहमदपूर येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा तळेगाव रोडवरील अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
जागतिक सायकल दिनानिमित्त 1 जून ते 14 जून या कालावधीत देशभरातील 200 ठिकाणी ‘अस्मिता वूमन लीग’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, अहमदपूर येथील स्पर्धा या राष्ट्रीय उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
केंद्र शासनाचे क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, लातूर जिल्हा सायकलिंग असोसिएशन, जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर आणि अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्षांखालील वयोगटातील मुलींना सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार असून, विजेत्यांचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
लातूर जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त प्रा. गणपतराव माने, सचिव शरद माने, सहसचिव प्रशांत माने, कोषाध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ता गलाले, आदर्श क्रीडा मार्गदर्शक संतोष कदम आणि एसआरटीएमयू नांदेडचे सिनेट सदस्य विनोद माने यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुली आणि खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis