वांजोळा चौफुली ठरतेय ‘मृत्यूचा सापळा’ ; महिनाभरात 47 जणांचा अपघाती मृत्यू
जळगाव, 10 जून (हिं.स.) : भुसावळ शहरालगत मुंबई–नागपूर महामार्गावरील वांजोळा चौफुली अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असून, या परिसरात वाढत्या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एका महिन्यात येथे तब्बल 10 अपघातांची नोंद झाली
वांजोळा चौफुली ठरतेय ‘मृत्यूचा सापळा’ ; महिनाभरात 47 जणांचा अपघाती मृत्यू


जळगाव, 10 जून (हिं.स.) : भुसावळ शहरालगत मुंबई–नागपूर महामार्गावरील वांजोळा चौफुली अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असून, या परिसरात वाढत्या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एका महिन्यात येथे तब्बल 10 अपघातांची नोंद झाली असून, मागील तीन वर्षांत या ठिकाणी 47 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चौकाला आता स्थानिकांकडून ‘मृत्यूचा सापळा’ अशी ओळख मिळत आहे.

दीपनगर ते नशिराबाद मार्गावरील वांजोळा चौफुली हा भुसावळ परिसरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू मानला जातो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने, विशेषतः अवजड वाहतूक दिवसरात्र सुरू असते. महामार्गावरील वर्दळ, वाहनांचा वेग आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे येथे वारंवार अपघात घडत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षांपासून या चौकात अपघातांची मालिका सुरूच असून, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच पादचारी मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. काही अपघातांमध्ये गंभीर जखमी होण्याच्या घटना घडल्या असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, वांजोळा चौफुलीवरील चुकीचे वाहतूक नियोजन, अवजड वाहनांचा अति वेग, चुकीच्या दिशेने होणारी वाहतूक आणि नियमांचे उल्लंघन ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. विशेषतः महामार्गावरील अवजड वाहनांमुळे छोट्या वाहनांसाठी मोठा धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी केली असली तरी अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रभावी वाहतूक नियंत्रण, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि पायाभूत सुविधा तातडीने उभारण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, वाहतूक विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र अपघातांची वाढती संख्या पाहता केवळ आवाहनांपेक्षा ठोस उपाययोजनांची आवश्यकता असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वांजोळा चौफुलीवरील वाढत्या दुर्घटनांवर प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande