बालकामगार ठेवल्यास मालकांवर होणार फौजदारी कारवाई
नंदुरबार, 10 जून (हिं.स.) | बालमजुरीमुळे बालकांचे शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण होते. हे शोषण थांबवून जिल्ह्यातून बालकामगारांचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दिनांक 12 जून हा दिवस ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ म
बालकामगार ठेवल्यास मालकांवर होणार फौजदारी कारवाई


नंदुरबार, 10 जून (हिं.स.) | बालमजुरीमुळे बालकांचे शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण होते. हे शोषण थांबवून जिल्ह्यातून बालकामगारांचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दिनांक 12 जून हा दिवस ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जात असून, या निमित्ताने बालकामगार ठेवणाऱ्या मालकांवर कठोर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. राज्याचे कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड (भा.प्र.से.) यांनी दिलेल्या निर्देशानुसार, तसेच नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, नाशिक विभागाचे कामगार उप आयुक्त विकास माळी आणि जळगावचे सहाय्यक कामगार आयुक्त डॉ. राजू गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनानुसार हा दिवस साजरा केला जात आहे.

बालकामगार कायदा आणि शिक्षेच्या कडक तरतुदी: बालकामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा अधिनियम, 2016 मधील तरतुदींनुसार बालमजुरी हा गंभीर व फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला आहे: 14 वर्षांखालील बालके: कोणत्याही प्रकारच्या आस्थापनांमध्ये 14 वर्षांपेक्षा लहान बालकामगारांना कामावर ठेवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. 14 ते 18 वयोगट (किशोरवयीन): या वयोगटातील मुलांना कोणत्याही धोकादायक उद्योग किंवा प्रक्रियेच्या ठिकाणी कामावर ठेवल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. तात्काळ अटक व गुन्हा: बालकामगार आढळल्यास त्याची मालकाच्या छळातून त्वरित मुक्तता केली जाते आणि संबंधित मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता व बालकामगार कायद्याच्या कलम 3 व 3-अ अंतर्गत पोलिसांत गुन्हा नोंदवून अटकेची कारवाई केली जाते. पहिल्यांदा गुन्हा केल्यास आणि पुनरावृत्ती झाल्यास होणारी शिक्षा: प्रथमच गुन्हा आढळल्यास: 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत वाढू शकणारा तुरुंगवास किंवा किमान 20 हजार रुपये ते कमाल 50 हजार रुपयांपर्यंत दंड, अथवा ही दोन्ही प्रकारची शिक्षा मालकास होऊ शकते. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास: आधी गुन्हा सिद्ध झालेला असताना पुन्हा बालकामगार ठेवल्यास 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत वाढू शकणारा तुरुंगवास किंवा 10 हजार रुपये दंड, अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

प्रशासनाचे जाहीर आवाहन: जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, हॉटेल्स, विटभट्ट्या, खडी क्रशर, चहाच्या टपऱ्या इत्यादी ठिकाणांच्या मालकांनी आपल्याकडे कोणत्याही बालकामगाराला कामावर ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जर कुठेही बालक किंवा किशोरवयीन मुलाला कामावर ठेवल्याचे आढळल्यास, नागरिकांनी तात्काळ ‘सरकारी कामगार अधिकारी, धुळे प्लॉट नं. 231, तळ मजला, मीरा हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे’ या कार्यालयाशी संपर्क साधावा. नागरिक आपली तक्रार glodhule@yahoo.com या ईमेलवर किंवा 02562-283340 या दूरध्वनी क्रमांकावर देखील नोंदवू शकतात, असेही आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीमती मधुरा सूर्यवंशी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande