
कोल्हापूर, 10 जून (हिं.स.)। सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कणेरी येथील न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख व वैद्यकीय संचालक, जागतिक ख्यातीचे मेंदू शल्यविशारद डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या नेतृत्वाखाली जगातील पहिली मानली जाणारी १७ तासांची अतिदुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून जागतिक वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक यशामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील एका धर्मादाय रुग्णालयाने जागतिक वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
याबाबत न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना महानगरांप्रमाणेच जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, या दूरदृष्टीतून सिद्धगिरी मठाचे अध्यक्ष परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरणेने सिद्धगिरी हॉस्पिटलची उभारणी झाली. आज त्याच संकल्पनेचे मूर्त स्वरूप म्हणून सिद्धगिरीने आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. रुग्णसेवा, संशोधन आणि अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान यांचा संगम घडवत संस्थेने आरोग्यसेवेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
केसची गुंतागुंत:
सदर रुग्णाला Cavernous Internal Carotid Artery (ICA) Aneurysm हा अत्यंत धोकादायक आणि दुर्मिळ आजार होता. मुख्य आव्हान असे होते की, पर्सिस्टंट प्रिमिटिव्ह ट्रायजेमिनल आर्टरी (PPTA) — जी एक भ्रूणावस्थेतील अतिदुर्मिळ रक्तवाहिनी आहे — ती ICA च्या त्याच अॅन्युरिझम असलेल्या भागातून निघत होती. संपूर्ण पोस्टेरिअर सर्क्युलेशन, (Brain Stem) व लहान मेंदू यांना रक्तपुरवठा करणारी ही PPTA एकमेव रक्तवाहिनी होती. लहान मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन्ही व्हर्टेब्रल आर्टरीज जन्मतःच अनुपस्थित होत्या.
वैद्यकीय साहित्य आणि जागतिक संशोधनामध्ये अशा प्रकारच्या रुग्णाची नोंद यापूर्वी कधीही झालेली नसल्याने ही केस अत्यंत दुर्मिळ आणि अभूतपूर्व मानली जात आहे. या परिस्थितीत शस्त्रक्रियेतील अगदी छोटी चूकसुद्धा रुग्णासाठी जीवघेणी ठरू शकत होती. मेंदूच्या महत्त्वाच्या भागांचा रक्तपुरवठा कायम राखत आजारी रक्तवाहिनीचे सुरक्षित व्यवस्थापन करणे हे अत्यंत मोठे आव्हान होते.
१७ तास चाललेल्या या हाय-फ्लो बायपास शस्त्रक्रियेत न्यूरोसर्जरी, न्यूरो अॅनेस्थेशिया, न्यूरोफिजिओलॉजी, रेडिओलॉजी आणि नर्सिंग विभागातील तज्ज्ञांनी सलग १७ तास अत्यंत एकाग्रतेने, अचूक नियोजनाने आणि उत्कृष्ट समन्वयाने काम करत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
जागतिक ख्यातीचे मेंदू शल्यविशारद डॉ. मरजक्के यांनी यापूर्वी १०० हून अधिक ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. या समृद्ध अनुभवाच्या बळावरच वैद्यकीय साहित्यात यापूर्वी नोंद नसलेल्या या अतिदुर्मिळ आणि जटिल रुग्णावर यशस्वी उपचार करणे शक्य झाले.
“Textbooks didn't have this. 100+ bypasses of experience did.” — हा अनुभवच या यशामागे होता.
राष्ट्रीय सन्मान: या जागतिक कामगिरीची दखल घेत Neurological Society of India (NSI-BOE) या देशातील सर्वोच्च न्यूरोलॉजिकल संस्थेने दिनांक १३ व १४ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित NSI-BOE Brain Bypass Workshop साठी सिद्धगिरी हॉस्पिटलची निवड केली आहे. विशेष म्हणजे भारतातील एखाद्या ग्रामीण धर्मादाय रुग्णालयाला प्रथमच हा मान मिळत आहे.
या कार्यशाळेत देशभरातील नामवंत न्यूरोसर्जन्स, मायक्रोव्हॅस्क्युलर तज्ज्ञ आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी होणार असून ब्रेन बायपास सर्जरी, मायक्रोव्हॅस्क्युलर अॅनास्टोमोसिस, रिव्हॅस्क्युलरायझेशन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक न्यूरोसर्जिकल कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले:
ही केवळ रक्तवाहिनीची बायपास शस्त्रक्रिया नव्हती, तर वैद्यकीय क्षेत्रातील अशक्यतेच्या सीमेलाच दिलेले आव्हान होते. ही कौशल्य, विज्ञान आणि आत्म्याची मॅरेथॉन होती. १७ तासांच्या अखंड समन्वित कामातून नवा विक्रम रचला गेला. ही शस्त्रक्रिया कोणत्याही मेट्रो शहरातील कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये किंवा मोठ्या केंद्रीय संस्थेत झाली नाही. ती सिद्धगिरीसारख्या ग्रामीण धर्मादाय रुग्णालयात झाली.
पाठ्यपुस्तकांमध्ये याचे उत्तर नव्हते, परंतु शम्भरहून अधिक ब्रेन बायपास शत्रक्रिया करूण डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी राष्ट्रीय स्तरावत एक विक्रम प्रस्थापित केला आहे. या कामगिरिची दखल घेउन न्यूरोजिकल सोसाइटी ऑफ़ इंडिया या न्यूरोसर्जररिच्या शिखर संस्थाने ब्रेन बायपास कार्यशाळेसाठी या सिद्धगिरि हॉस्पिटल सारख्या ग्रामीण रुग्णालयाची निवड़ केली आहे .या कार्यशालेसाठी देश-विदेशातील न्यूरोसर्जन येथे येत आहेत. हा ‘केअर बियॉन्ड क्युअर’ आणि ‘वर्क इज वर्शिप- काम ही कैलास ’ याचा पुरावा आहे. पूज्य स्वामीजींच्या आशीर्वादाने.
यातून सिद्ध होते की योग्य दृष्टीकोन, हेतू, टीम आणि पायाभूत सुविधा असतील तर देव सर्वात कठीण काम तुमच्या हातून घडवतो. आपण केवळ त्याचे साधन असतो. हा ‘केअर बियॉन्ड क्युअर’ आणि ‘वर्क इज वर्शिप- काम ही कैलास’ याचा पुरावा आहे. पूज्य स्वामीजींच्या आशीर्वादाने आम्ही हा जागतिक टप्पा गाठू शकलो.
सध्या रुग्णाची प्रकृती उत्तम असून तो समाधानकारकरीत्या बरा होत आहे. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेचा शास्त्रीय अहवाल आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू असून भविष्यात ही केस जगभरातील न्यूरोसर्जन्ससाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar