
रत्नागिरी, 10 जून (हिं.स.) । महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने विद्यार्थिनी आणि पालकांसाठी क्रिएटिव्ह करिअर्स मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन केले होते. या सेमिनारला चांगला प्रतिसाद मिळाला. दहावी, बारावी तसेच पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना विविध व्यावसायिक क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
या सेमिनारमध्ये फॅशन डिझायनिंग, इंटीरियर डिझायनिंग, ट्रॅव्हल अँड टुरिझम, तसेच ब्युटी अँड वेलनेस या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अपूर्वा पाडे (पुणे) यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील संधी व कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन केले. प्राजक्ता शिंदे (पुणे) यांनी इंटीरियर डिझायनिंग क्षेत्रातील आधुनिक संधी व करिअर पर्यायांची माहिती दिली. दिशा सोलंखी (मुंबई) यांनी ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच भाग्यश्री शिंदे (पुणे) यांनी ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातील व्यावसायिक संधी व प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली.
तज्ज्ञांना शंका विचारून, त्यांच्याशी चर्चा करून उपस्थितांना माहिती घेता आली. विद्यार्थिनी व पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन विविध प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य करिअरच्या निवडीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. या सेमिनारमुळे विद्यार्थिनींना त्यांच्या आवडीनुसार व कौशल्यांनुसार करिअर निवडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.
या कार्यक्रमात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या सौ. स्वरूपा सरदेसाई, महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या (BCA) प्र-प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांची विशेष उपस्थिती होती. हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हच्या मालक तथा BKVTI सल्लागार समिती सदस्या सौ. ममता नलावडे यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
शिक्षकवृंद, सर्व कर्मचारीवृंदाचेही यात योगदान होते. अशा उपयुक्त, मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थित विद्यार्थिनी व पालकांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी