
चंद्रपूर, 10 जून (हिं.स.) : राज्यात कापूस पिकाची उत्पादकता वाढविणे, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) 2026-27’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कापूस पीक प्रात्यक्षिके राबविण्यासाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पीक प्रात्यक्षिकांसाठी लाभार्थी निवड करताना काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. अर्ज करणारा शेतकरी गट 31 मार्च 2026 पूर्वी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच महाडीबीटी पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
योजनेअंतर्गत एका गटात कमाल 25 शेतकऱ्यांचा समावेश असू शकतो. प्रत्येक गावातून प्रति पीक जास्तीत जास्त दोन गटांची निवड करण्यात येईल. लाभ घेणाऱ्या प्रत्येक शेतकरी सभासदाकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय शेतकरी गट, एफपीओ किंवा सहकारी संस्थांना हमीपत्र सादर करावे लागणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार
या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सुधारित कापूस वाण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, जल व्यवस्थापन तसेच अन्य आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुधारित शेती पद्धतींची माहिती मिळून कापूस उत्पादन आणि उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
ऑनलाईन अर्जाचे आवाहन
कृषी विभागाने सर्व पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ‘कपास क्रांती’ अभियानामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव