बांधकाम कामगार नोंदणीसाठी अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक; लाभांसाठी कोणतेही शुल्क नाही
चंद्रपूर, 10 जून (हिं.स.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, नोंदणीसाठी अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक असल्याची
बांधकाम कामगार नोंदणीसाठी अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक; लाभांसाठी कोणतेही शुल्क नाही


चंद्रपूर, 10 जून (हिं.स.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, नोंदणीसाठी अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येते. अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यानंतर कर्मचारी व नोंदणी अधिकारी त्यावर कार्यवाही करतात. अर्ज मंजूर अथवा नामंजूर झाल्यास त्याची माहिती कारणांसह संबंधित कामगाराला एसएमएसद्वारे कळविण्यात येते.

मंडळाकडून विविध कल्याणकारी योजनांचे लाभ थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केले जातात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी व लाभ प्रक्रियेसाठी कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाईन प्रक्रियेसाठी कोणीही पैसे, कमिशन किंवा लाचेची मागणी केल्यास संबंधित जिल्हा कामगार कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील सूचना प्रत्येक जिल्हा व तालुका कामगार सुविधा केंद्रात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी नियोक्ता किंवा ठेकेदार यांनी पात्र कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर शहरी भागात महानगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायतीने अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडूनच हे प्रमाणपत्र देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मंडळाच्या सर्व सेवा विनामूल्य असून, कोणाकडूनही पैसे किंवा लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा acbwebmail@mahapolice.gov.in या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्र. भि. कावळे यांनी केले आहे. तसेच कामगारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असेही त्यांनी सांगितले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande