विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिम यशस्वी करा-मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
पुणे, 10 जून (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, याबाबत नागरिकांना वस्तूनिष्ठ माहिती होण्याक
Vjgg


पुणे, 10 जून (हिं.स.)।

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, याबाबत नागरिकांना वस्तूनिष्ठ माहिती होण्याकरिता व्यापक स्वरुपात जनजागृती, शंकाचे निरसन, लोकप्रतिनिधींचा सहभाग, सामाजिक संस्था आदी घटकांना विश्वासात घेवून मतदार यादी अद्ययावत करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. एसआयआर मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मिळून समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीमेबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, यांच्यासह मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

श्री. चोकलिंगम म्हणाले, एसआयआर मोहिमेच्या उद्देशाबाबत मुद्रित, इलेक्ट्रानिक, समाज माध्यम तसेच रेडिओद्वारे व्यापक स्वरुपात जनजनागृती करावी. एसआरच्या अनुषंगाने माहिती देण्याकरिता मदत कक्ष कार्यान्वित करा. नागरिकांच्या शंकांबाबत बैठक घेवून त्याचे निराकरण करावे, बैठकीत वस्तूस्थितीदर्शक माहिती त्यांच्यासमोर मांडावी. प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवक आदी घटकांना सोबत घेवून काम करावे.

भारतीय नागरिकाबाबत सर्वोच्च न्यायलायाचे न्यायनिर्णय, भारतीय लोकप्रतिनिधी कायदा, भारतीय संविधानातील तरतुदींचा अभ्यास करुन काम करावे. एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही, तसेच कोणत्या परिस्थितीत अपात्र नागरिक मतदार यादीत समावेश होणार नाही, मतदार यादीतील नावे खात्री करुनच कमी करावी. यादृष्टीने सुक्ष्मनियोजन करुन काम करावे. महसूल विभागासोबतच आवश्यकतेप्रमाणे इतर विभागाची मनुष्यबळाची नियुक्ती करावी. मतदान केंद्रनिहाय उद्दिष्ट निश्चित करुन मतदार यादी मॅपिंगच्या कामाला गती द्यावी.

एसआयआर मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेण्यात येणार आहे. घरोघरी भेट देऊन पूर्वमुद्रित फॉर्मद्वारे मतदारांची माहिती पडताळणी केली जाणार आहेत. नाव, पत्ता, छायाचित्रे किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास त्याची नोंद करता येणार आहे. तसेच पत्त्यावर उपस्थित नसलेले (अब्सेंट), स्थलांतरीत (शिफ्टेड), मयत (डेड) आणि डुप्लीकेट (एएसडीडी) प्रकारातील नोंदींची तपासणीही केली जाणार आहे. सन २००२ ते २००४ मधील जुन्या मतदार याद्यांशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले. शासकीय निवासस्थानामध्ये वासत्वय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र घेवून पुढील कार्यवाही करावी.

श्री. डुडी म्हणाले, सन २००२ मध्ये जिल्ह्यात ४६ लाख ९ हजार १२७ इतके मतदार होते तर सन २०२६ मध्ये जिल्ह्यात ९० लाख ९० हजार ९७० मतदार आहेत. एसआयआर मोहीमेअंतर्गत मतदारांच्या नोंदींच्या अनुषंगाने घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहेत. याकरिता जिल्ह्यातील सुमारे ८ हजार ४१७ बीएलओ आणि विविध राजकीय पक्षांचे ४ हजार ५५७ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. एसआयआर पुर्वतयारीच्या अनुषंगाने मॅपिंग, मनुष्यबळाची नियुक्ती, प्रशिक्षण, मतदार गणना फार्मची छपाई, सुनावणी व पडताळणी प्रकिया, आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल तसेच कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, अशी ग्वाही श्री. डुडी यांनी यावेळी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande