
विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय चर्चांना उधाण
अमरावती, 10 जून (हिं.स.) :: अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांना अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे वृत्त असून, यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांना नागपूरमधील वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अमरावतीतील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर देशमुख रुग्णालयात दाखल असल्याची पुष्टी केली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून, निवडणूक प्रक्रियेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना उमेदवाराच्या प्रकृतीबाबतची ही माहिती समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अँजिओप्लास्टीनंतर डॉक्टर सामान्यतः काही दिवस विश्रांतीचा सल्ला देतात. त्यामुळे देशमुख यांचा प्रत्यक्ष प्रचारातील सहभाग मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात आधीच एका उमेदवाराची माघार झाल्याने परिस्थिती बदलली होती. अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्यानंतर त्यांची उमेदवारी प्रक्रियेतून बाहेर पडली. त्यानंतर भाजपचे प्रवीण पोटे, बहुजन वंचित आघाडीचे डॉ. निलेश विश्वकर्मा आणि महाविकास आघाडीचे हर्षजीत देशमुख हे तिघेच प्रमुख उमेदवार मैदानात उरले होते.
मात्र, देशमुख यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे तळागाळातील प्रचारात त्यांची अनुपस्थिती राहिल्यास निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या निवडणुकीतील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले असून, आगामी काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी