
अमरावती, 10 जून (हिं.स.)। नवीन शैक्षणिक वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये सध्या वह्या, पुस्तके, दप्तर आणि गणवेश खरेदीसाठी पालकांची मोठी लगबग आणि गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, यंदा महागाईचा मोठा फटका पालकांना बसत असून, गतवर्षीच्या तुलनेत शालेय साहित्याच्या दरामध्ये तब्बल १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय पालकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले असून, शैक्षणिक खर्च हजारांच्या घरात पोहोचला आहे.
यंदा शहरातील बाजारात वह्या, पुस्तके, पेन आणि दप्तराच्या किमतींत थेट २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. केवळ पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांच्या प्राथमिक शैक्षणिक साहित्याचा विचार केला, तरी पालकांना किमान ३ ते ५ हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक साहित्यातील नफा पाहून अनेक खासगी शाळांनी स्वतःचेच विक्री स्टॉल्स सुरू केले आहेत.संबंधित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरत्र खरेदीचा पर्याय न ठेवता, याच अधिकृत स्टॉल्सवरून साहित्य घेण्याची सक्ती केली जात आहे. बाजार भावापेक्षा अधिक दर असलेल्या या शाळांच्या स्टॉल्समुळे एका विद्यार्थ्यांच्या केवळ नोटबुक, पुस्तके आणि गणवेशासाठी पालकांना तब्बल १० ते १५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. पुढील काळातसाहित्य दरात वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.
बाजारपेठेतील सरासरी खर्च
वह्या व पुस्तके - ३,००० ते ५,०००
शालेय दप्तर - ३५० ते १,५००
बूट आणि सॉक्स - ५०० ते १,०००
शालेय गणवेश - १,००० ते १,५००
इतर साहित्य – ५०० ते १,००० सरासरी १२ ते १५ हजार खर्च
महागडी पुस्तके, युनिफॉर्मच्या फॅडमुळे बजेट कोलमडले
शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये बालभारतीची पुस्तके अत्यंत माफक दरात मिळतात. याउलट, इंग्रजी शाळांमध्ये स्मार्ट लर्निंगच्या नावाखाली खासगी प्रकाशकांची महागडी पुस्तके सक्तीची केली जातात. केवळ पहिली ते चौथीच्या एका सेटची किंमत ३ ते ४ हजारांच्या घरात जाते. त्यातच नियमित युनिफॉर्म, स्पोर्ट्स युनिफॉर्म आणि हाऊस युनिफॉर्म अशा नवनवीन फॅडमुळे पालकांचे बजेट कोलमडले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी