
रत्नागिरी, 10 जून (हिं.स.) | सुकवली (ता. खेड) येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात खडी वाहतूक करणारा डंपर सुमारे ३५ फूट खोल दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०८ डब्ल्यू ८४७१ क्रमांकाचा डंपर खडी वाहतूक करत असताना सकाळी सुमारे पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सुकवली क्रशर परिसरात चालक डंपर मागे घेत होता. यावेळी चालकाचा अंदाज चुकल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि डंपर दरीत कोसळला.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र डंपर मोठ्या उंचीवरून खाली कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
या दुर्घटनेमुळे सुकवली परिसरात शोककळा पसरली असून मृत चालकाची ओळख आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी