
लातूर, 10 जून (हिं.स.)यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष दि. १५ जूनपासून सूरु होत आहे. पाठ्यपुस्तके शाळेत दिली जाणार असली तरी वह्या, पेन, कंपास, दप्तर आदी साहित्यांची खरेदी मात्र बाजारातून करावी लागते. त्यासाठी बाजारपेठेत लगबग सुरु झाली आहे. मात्र यंदा महागाईचा मोठा फटका पालकांना बसत आहे. गतवर्षीच्या तूलनेत यंदा शालेय साहित्यात तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय पालकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
यंदा बाजारात वह्या, पेन आणि दप्तरांच्या किमती थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. केवळ पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांच्या प्राथमिक शैक्षणिक साहित्याचा विचार केला तर पालकांना किमान ३ ते ५ हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक साहित्यातील नफा पाहून अनेक खाजगी शाळांनी स्वतःचेच विक्री स्टॉल्स सुरु केले आहेत.
संबंधीत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरस्त्र खरेदीचा पर्याय न ठेवता, याच अधिकृत स्टॉल्सवरुन साहित्य घेण्याची सक्ती केली जात आहे. बजारभावापेक्षा अधिक दर असलेल्या या शाळांच्या स्टॉल्समुळे एका विद्यार्थ्यांच्या केवळ वह्या, पुस्तके आणि गणवेशासाठी पालकांना तब्बल १० ते १५ हजार रुपये मोजावे लागत आहे.
बाजारपेठेत वह्या व पुस्तके ३ हजार ते ५ हजार रुपये, शालेय दप्तर ३५० ते १ हजार ५०० रुपये, शालेय गणवेश १ हजार ते १ हजार ५०० रुपये, इतर साहित्य ५०० ते १ हजार रुपये, सरासरी १२ ते १५ हजार रुपयांचा खर्च येत आहे. शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये बालभारतीची पुस्तके अत्यंत माफक दरात मिळतात. या उलट इंग्रजी शाळांमध्ये 'स्मार्ट लर्निंग'च्या नावाखाली खासगी प्रकाशकांची महागडी पुस्तके सक्तीची केली जातात. केवळ पहिली ते चौथीच्या एका सेटची किंमत ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत आहे. त्यातच नियमित युनिफॉर्म, स्पोर्टस युनिफॉर्म, हाऊस युनिफॉर्म, अशा नवनवीन गोष्टींमुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis