
छत्रपती संभाजीनगर, 10 जून, (हिं.स.)। खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने खत बुकिंगसाठी सुरू केलेल्या नव्या ॲपमुळे शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ॲपमधील तांत्रिक त्रुटी, सर्व्हर डाऊन होणे, नेटवर्कची समस्या तसेच अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसल्याने खत वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये अनावश्यक वाद निर्माण होत असून शेतीच्या कामांवरही त्याचा परिणाम होत आहे.
यासंदर्भात कृषी सेवा केंद्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सदर ॲप तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे सुलभ पद्धतीने शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
या विषयाची गंभीर दखल घेत तात्काळ कृषिमंत्र्यांशी चर्चा करून शेतकरी हिताचा योग्य तो तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि वेळेत खते उपलब्ध व्हावीत, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis